भारतराजकारण

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर छापा; आप नेत्या आतिशींचा आरोप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने हा छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. आयोगाचे पथक कपूरथळा हाऊसमध्ये पोहोचले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान यांच्या कपूरथला येथील घरावर छापा टाकण्यासाठी दिल्ली पोलीस आले होते, असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. यावर निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिले असून, केवळ पैसे वाटपाच्या प्राप्त तक्रारीच्या आधारावरच आम्ही त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो होतो, मात्र आम्हाला घरात येऊ दिले नाही, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलीस-निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप

भगवंत मान यांनी देखील एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. भगवंत मान म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाचे पथक दिल्ली पोलिसांसह माझ्या दिल्लीतील कपूरथला हाऊस येथील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहे. भाजपची लोकं दिल्लीत उघडपणे पैसे वाटत आहेत, पण दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोगाला हे दिसत नाही. यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये. एक प्रकारे, दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर पंजाबी लोकांना बदनाम करत असून, हे अत्यंत निषेधार्ह आहे.’

निवडणूक आयोगाने फेटाळले आरोप

 

दरम्यान, आपचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहे. पैसे वाटपाच्या प्राप्त तक्रारीच्या आधारावरच आम्ही त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो होतो, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

निवडणूक आयोगाचे अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की, “आम्हाला पैसे वाटपाबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे 100 मिनिटांत तक्रार निवारण करावे लागते. आमचा भरारी पथक येथे आले, मात्र त्यांना आत येऊ दिले गेले नाही. मी येथे कॅमेरामनसह आम्हाला आत येऊ देण्याची विनंती करण्यासाठी आलो आहे. पैसे वाटपाची तक्रार cVIGIL अॅपवर आली होती., अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, दिल्लीत विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button