महाराष्ट्रराजकारण

माणसं मारण्याचे समर्थन करायचे का, कराडसोबतच्या संबंधावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत आहे. यामध्ये वाल्मिक कराड हे नाव देखील चांगलेच चर्चेत आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यानंतर परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांकडून आंदोलन केले जात आहे. यादरम्यान काल कराड कुटुंबियांनी दावा केला होता की, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी भाजपाचे आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते. यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

…तर मग त्याचं समर्थन करायचं का?
हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा कराड कुटुंबियांचा दावा सुरेश धस यांनी सपशेल फेटाळून लावला आहे. याविषयी बोलताना सुरेश धस यांनी, “मी वाल्मिक कराड यांना भेटलो नाही. माझं वाल्मिक कराड यांच्याबरोबर वाईट काय होतं? वाल्मिक कराड बरोबर माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड ज्या पद्धतीने माणसं मारायला लागला तर मग त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून असं वागल्यावर त्यांच्याबरोबर राहायचं का?”असा संतप्त सवालही उपस्थित केला आहे.

मग रद्द करणार नाहीत तर काय करतील?
अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्याबद्दल प्रतिक्रिया देताना “अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत ते जाहीर करतील. अटक झालेले विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष होते. बरखास्त करावं लागेल नाहीतर इज्जतीचा पंचनामा होईल. यांच्या पक्षाचे बरेच लोक यांच्यावर अनेक गुन्हे असतील, मग रद्द करणार नाहीत तर काय करतील?” असे म्हटले.

वाल्मिक कराडच्या आईचे स्टेशनबाहेर आंदोलन
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीत आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या कुटुंबियांकडून देखील आंदोलनात सहभाग घेतला जात आहे. वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनीदेखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. “माझ्या लेकावर झालेला अन्याय थांबवा आणि त्याची सुटका करा. त्याच्यावर लावलेले सर्व गुन्हे खोटे आहेत. जाणूनबुजून राजकारण केलं जातंय”, असं वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button