…. तर तुम्हाला पाच वर्ष सुखाने खाऊ देणार नाही : जरांगे पाटील
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शनिवार (दि.२५) जानेवारीपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. मात्र, तरीही जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी याच अवस्थेत उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माध्यमांशी बोलतांना अल्टिमेटम दिला आहे.
जरांगे म्हणाले की, “आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही ते सरकारने सांगावं, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही. संध्याकाळपर्यंत अंमलबजावणी करायची की नाही हे सांगून टाका. तोंड लपवू नका. आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे. आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असे वाटत नव्हते. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असे वाटत नव्हते. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसत आहेत, सगळे मेल्यावर सांगू नका. दहा दिवसांनी सांगितल्यापेक्षा, आजच सांगून टाका. संध्याकाळपर्यत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्विकारता येईल. मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो. पण स्वार्थासाठी नाही. यातच जातीच कल्याण आहे. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही?” असे म्हणत जरांगेंनी फडणवीस सरकारला अल्टीमेटम दिला.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी काल (मंगळवारी) संतोष देशमुख यांच्या आईच्या आग्रहामुळे पाणी पिले होते. तर उपोषणस्थळी त्यांना सलाईन देखील लावण्यात आले होते. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिला आहे.