त्या तीन पोलिसांमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, अंधारेंचा गंभीर आरोप
नागपूर : परभणी हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून विविध आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणी मुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. यावेळी त्यांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील घेतली आहेत. तसेच दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी देखील अंधारे यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता, तो लॉ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीतील अमानुष मारहाणीमुळे झाला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला
यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलीस खात्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमची मागणी आहे की, पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
काय घडले त्या दिवशी, अंधारे यांचा गंभीर आरोप
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यावर आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थिती शांती बैठक घेतली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. या नंतर आंबेडकरी संघटना यांनी विरोध प्रदर्शित करण्याकरिता शांतीपूर्ण बंद पुकारण्याची घोषणा केली. ज्या दिवशी आंबेडकरी संघटना यांनी बंद पुकारला होता, त्याच दिवशी भाजपच्या वतीने बांगलादेशी हिंदूंसाठी मोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद दुपारपर्यंत शांतीत सुरू होता. मात्र दुपारनंतर भाजपच्या मोर्च्यात सहभागी काही लोकांनी निळे दुप्पटे घेत हिंसाचार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बंदबाबत माहिती होती, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज होती. आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी बंदच्या नावाखाली तोडफोड करण्यात आली, असा आरोप अंधारे यांनी केला.