उध्दव ठाकरे यांचा वचननामा, काय आहे वचननाम्यात
मुंबई : मातोश्री येथे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात अनेक मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. आम्ही युतीत होतो तेव्हाही वचननामा आणला होता. आता महाविकास आघाडीत असतानाही आमचा वचननामा आणला आहे. त्यामुळे आम्ही काही वेगळी भूमिका घेतली नसल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.यावेळी अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. क्युआर कोड स्कॅन केल्यावर वचननामा वाचता येणार आहे.
‘सागरी महामार्गाचं वचन दिलं होतं आणि ते आम्ही करून दाखवलं. 10 रुपयात गरिबांना जेवण देऊ हे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं. शिवसेना म्हणून आमचं काही कर्तव्य आहे. मुलींना शिक्षण मोफत आहेच पण मुलांना देखील आम्ही शिक्षण मोफत देऊ,’असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
काय आहे वचननाम्यात?
महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
पुढच्या ११ वर्षात महाराष्ट्राचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि आधुनिक इतिहास तसंच प्रगतीशील आणि पुरोगामी संस्कृतीचं दर्शन घडवणारी लेणी उभारणार.
प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार. याशिवाय ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार
जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.
सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार, बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.
मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर अतिरिक्त बांधकाम होऊ न देता ती जागा मुंबईकरांसाठीच मोकळी ठेवणार
मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.