उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवार (दि.२९) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १७ भाविकांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या घटनेसाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,”प्रयागराजमध्ये येणाऱ्या कोट्यावधी लोकांची (People) सोय कशी करत होते याचे मार्केटिंग सरकार करत होते. तेथील व्यवस्थेवर लोक खुश नव्हते. जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या माध्यमातून पाहत होतो. स्वतः गृहमंत्री (Home Minister) जेव्हा कुंभमेळ्यात स्नान करून गेले. संरक्षण मंत्री जेव्हा आले तेव्हा तो परिसर सील करण्यात आला असेल. व्हीआयपी लोक जेव्हा जातात त्या वेळेला एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ परिसर बंद केला जातो. सामान्य श्रद्धाळूसाठी त्याचा हा परिणाम असेल”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “आज १० पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेल्यानंतरही तातडीच्या बैठका (Meeting) सुरू आहेत. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय करत आहेत? गृहमंत्री (Home Minister) लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय करत आहेत? ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? तसेच, अनेक श्रद्धाळू हे रस्त्यावर झोपून त्यानंतर स्नान करायला गेले आहेत, अशा प्रकारची व्यवस्था केली आहे का?”, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
तेव्हाचे मुख्यमंत्री पूर्णवेळ उपस्थित होते
१९५४ साली जो कुंभमेळा झाला, त्याची व्यवस्था बघा. तेव्हा नेहरूंनी कुंभमेळ्याचा दौरा केला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री पूर्णवेळ उपस्थित होते. पण त्यांनी राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभाचे आयोजन केले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सरकारवर लगावला आहे. तसेच कुंभमेळ्याच्या आयोजनात भष्ट्राचार झाल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.
कुंभमेळ्यातील १० हजार कोटी कुठे खर्च झाले? कुठे गेले पैसे? योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यासाठी मुलुंडच्या पोपटलालने प्रयागराजला जायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.