महाराष्ट्रराजकारण

तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही; बीड जिल्ह्याला शिस्त लागणे तुमच्याच फायद्याचे : अजित पवार

बीड जिल्ह्यात जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील. तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येत आहेत. या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते. पालकमंत्री पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिल्याच बीड दौरा होता. ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले आहेत. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. यानंतर आता अजित पवार अॅक्शनमध्ये आले आहेत.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक नुकतीच सुरू झाली आहे. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याठिकाणी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. “तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील. तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येत आहेत. या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे कलमे लावली जातील,’ असा इशारा अजित पवार यांनी दिला.

अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, ‘माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे काम केले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आहे की लांबचा हे मी पाहणार नाही. विकासाची काम करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या ते कानावर आल्यानंतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.’ असा थेट इशारा अजित पवारांनी दिला.

‘खंडणीची प्रकरणं खपवून घेणार नाही. रिव्हाल्वर लावून फिरतील तर त्यांचा परवाना रद्द करू. काम करताना दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा. चारित्र्य स्वच्छ ठेवा. जवळचा असला तरी चुकीचं वागू नका. तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई करणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल त्यावर कारवाई होणार आहे’, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

“प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलं. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्या. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई करणार”,  असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button