फडणवीसांना डावल्यास १००० कार्यकर्ते जाळून घेतील
मुंबई : विधानसभा निवडणूकीत महायुतीने बहुमत मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. महायुतीचा 29 नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या कोणतीच माहिती नसून राजनाथ सिंह यांच्याकडे याबाबत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तिन्ही पक्षातून जोर लावला जात आहे. अशातच भाजपच्या एका नेत्याने खळबळजनक ट्विट केलं आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी हे ट्विट केले आहे.
महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस
आत्ताच सांगून ठेवतो
जर उलट सुलट राजकारण झाल तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील.
मी त्यातला एक@Dev_Fadnavis
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) November 24, 2024
मुख्यमंत्रीपदावरून अवधूत वाघ ट्विट करत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस आहेत. मी आत्ताच सांगून ठेवतो, जर उलट सुलट राजकारण झालं तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील. मी त्यातला एक असेन, असं ट्विट त्यांनी केले आहे. ट्विटमुळे आता खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अशा स्थितीत आम्ही सर्वात मोठा पक्ष असून मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा, असा दावा भाजप नेते करत आहेत.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केल्याचा दावा एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी केला असून, त्या जोरावर महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असं त्यांचं म्हणणं आहे.