सायबर भामट्याकडून तरुणाला ७ लाखांचा गंडा
वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
वैजापूर: मोबाईलमध्ये आलेल्या लिंकला क्लीक करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या एका क्लीकमुळे सायबर भामट्यांंनी या तरुणाला तब्बल सात लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध २० जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत ज्ञानेश्वर मंडळ (वय २५) हा तरुण तालुक्यातील भग्गाव येथील रहिवासी असून तो खासगी नोकरी करून उपजीविका भागवितो. दरम्यान ७ जून रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास त्याचा मोबाईल क्रमांक
‘ 4 Amazon Global Part-time Recruitment-India’ या नावाच्या एका व्हाट्स अप ग्रुपमध्ये समाविष्ट झाला. या नंतर त्याच्या मोबाईलमध्ये टेलीग्राम अॅप्लीकेशन डाउलोड करणेबाबत एक संदेश आला. यामुळे त्याने मोबाईलमध्ये अॅप्लीकेशन इंस्टॉल केले. यापुढे त्याने ते अॅप्लीकेशन ओपन करून संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ALLOW-ALLOW करत गेला. पुढे त्याच्या मोबाईलमध्ये https://t.me/Marysanya23582 अशी फाईलची लिंक आली. म्हणुन त्याने त्या लींकला क्लीक केले.
नंतरही पुढील दोन,तीन दिवस त्याच्या मोबाईलमध्ये याच प्रकारे ऑनलाईन लिंक येत गेली. तरुणाने देखील “त्या” अॅप्लीकेशनची प्रक्रिया (प्रोसीजर)असेल असे समजून लिंकला क्लिक करत गेला. दरम्यान १७ जून रोजी संकेतने त्याचे एचडीएफसी बँकेचे खाते (अंकाउट) तपासले असता खात्यात ‘झिरो’ बॅलन्स असल्याचे त्याला समजले. याबाबत त्याने बँकेत जाऊन शहानिशा केली असता ७ जून रोजी खात्यातून ३० हजार रुपये कमी झाल्याचे त्याला समजले. याशिवाय त्याचे श्रीरामपूर येथील आयसीआयसीआय बँक खात्यातून देखील अनुक्रमे ९, १०, ११, १३,१६ जून या कालावधीत एकूण सहा लाख ७० हजार रुपये कपात झाल्याचे त्याला समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच या तरुणाने ऑनलाईन तक्रार करून छत्रपती संभाजीनगर येथील सायबर पोलीसांशी संपर्क साधला. पोलीसांनी त्याच्या वैजापूर येथील बॅंक खात्यातील ३० हजार तर श्रीरामपूर येथील आयसीआयसीआय बँक खात्यातील १८ हजार रुपये इतकी रक्कम होल्ड लावल्या बाबत कळविले. अखेर संकेत निर्मळ याने वैजापूर पोलीस ठाणे गाठत ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठळे करीत आहे.