महिला पोलिसाचा तिकीटास नकार अन् राजस्थान-हरियाणा पोलिस आमने-सामने, फाडले परस्पर राज्याच्या बसेसच्या पावत्या
नवी दिल्ली : राजस्थान रोडवेजची बस आणि हरियाणा पोलिसांची महिला कॉन्स्टेबल यांच्यातील झालेला वाद एवढा पेटला आहे की, दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांच्या शेकडो एसटी बसच्या पावत्या फाडल्या आहेत. भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होताच दोन्ही राज्यांचे पोलीस समोरासमोर उभे ठाकले आहेत.
हरियाणाच्या महिला पोलिसाकडे कंटक्टरने तिकीट मागितले, जेव्हा तिने दिले नाही तेव्हा ५० रुपये द्या तिकीट देते असे सांगितले. यावर महिला कॉन्स्टेबलने तिकीट घेण्यास नकार दिला. यावरून वाद सुरु झाला. कंडक्टरने तिला प्रवास करत असाल तर पैसे लागतील असे सांगितले. यावर बस हरियाणामध्ये चालतेय, कोणी अधिकारी येईल तेव्हा मी बोलेन असे कॉन्स्टेबलने सांगितले.
यावर कंडक्टरने तिला खाली उतरण्यास सांगितले. यावर कॉन्स्टेबलने त्यास नकार दिला. तसेच जबरदस्ती कशाची असे विचारत इथेच बस उभी करून ठेव असे सांगितले. जिथे न्यायचे तिथे ने पण मी भाडे देणार नाही, असे सांगितले. यानंतर हे प्रकरण पगारावर आले. कंडक्टरने तुला पगार मिळत नाही का म्हणून विचारले, यावर मिळतो पण मी पैसे देणार नाही असे पोलिसाने म्हटले. बस रस्त्याच्या कडेलाच थांबविण्यात आली. रात्रीची वेळ होती, इतर प्रवाशांची गैरसोय होत होती. तरीही कंडक्टरने बस थांबविण्याची सूचना ड्रायव्हरला केली.
यानंतर महिला पोलीस क़ॉन्स्टेबलला दंड करण्यात आला. यामुळे दोन्ही राज्यांच्या रोडवेज आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली. दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या बसवर चलान फाडण्यास सुरुवात केली आहे. आता हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले असून राजस्थान रोडवेज आणि हरियाणा पोलीस हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.