जरांगे पाटील हे देर आये, दुुरुस्त आये… निवडणुक न लढवण्याच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच आता आपल्याला पाडापाडी करावी लागणार असंही मनोज जरांगे म्हणाले. एका जातीवर धाडस करणे शक्य नाही. मी मतदारसंघ ठरवले होते, फक्त उमेदवार ठरवायचे होते. राजकारणाची प्रक्रिया वेगळी, आणि सामाजिक कार्याची प्रक्रिया वेगळी आहे. त्रास देणाऱ्यांना मराठ्यांनी सोडायचं नाही, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. तसेच उमेदवारांनी अर्ज मागे घ्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. कोणाच्या प्रचाराला आणि सभेला जाऊ नका, अशा सूचना देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला दिल्या.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. मराठा समाजाचे 60 ते 70 टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे.
दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होते. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात.
मनोज जरांगे यांनी निवडणुकीनंतर काय होईल हे सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी सुरु आहे, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांना जसे सांगता येत नाही तसे मला देखील सांगता येत नाही. मनोज जरांगे यांनी माघार जरी घेतली असली तर आंदोलन सुरूच राहणार असेही म्हटले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. पण आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असे होत नाही. त्यामुळे जरांगे यांचे काम सुरु राहील, असे त्यांनी म्हटले.