जगातील सर्वात श्रीमंत कुटूंबाची यादी जाहीर, अंबानी आहे या क्रमांकावर
ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या यादीत वॉल्टन कुटुंबाने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे 2024 या यादीनुसार, वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 432.4 अब्ज डॉलर झाली आहे. ही संपत्ती एलन मस्क आणि अनेक मध्य-पूर्व राजघराण्यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त आहे. या यादीत मुकेश अंबानी कुटूंब 99.6 अब्ज डॉलर संपत्तीसह 8व्या क्रमांकावर आहेत.
ही आहेत जगातील सर्वात पाच श्रीमंत कुटुंब
वॉल्टन कुटुंब (अमेरिका): 432.4 अब्ज डॉलर संपत्तीसह पहिले स्थान. कुटुंबाच्या तीन पिढ्या वॉलमार्ट चालवतात, ज्याची जगभरात 10,600 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
अल नाह्यान फॅमिली (UAE): 323.9 अब्ज डॉलर मालमत्तेसह दुसरे स्थान. हे कुटुंब संयुक्त अरब अमिरातीचे राजघराणे आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या नेतृत्वाखाली हे कुटुंब आहे. कुटुंबाची संपत्ती प्रामुख्याने तेल उद्योगाशी निगडीत आहे आणि अबू धाबीच्या शेअर बाजारात त्यांच्या व्यवसायांचा वाटा 65 टक्के आहे.
अल थानी कुटुंब (कतार) : 172.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसरे स्थान आहे. हे कुटुंब कतारच्या राजघराण्यातील आहे आणि त्यांची संपत्ती तेल आणि वायूच्या अफाट साठ्यातून आली आहे. त्याच्या व्यवसायांमध्ये हॉटेल, विमा कंपन्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय मालमत्तांचा समावेश आहे.
हर्मेस फॅमिली (फ्रान्स) : 170.6 अब्ज डॉलरसह मालमत्तेसह चौथे स्थान. या कुटुंबाकडे फ्रान्सचा प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Hermès आहे. ज्यामध्ये सहा पिढ्या आणि 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत.
कोच कुटुंब (अमेरिका) : 148.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचवे स्थान आहे. हे कुटुंब अमेरिकेतील तेल उद्योगाशी संबंधित आहे.
भारतीय कुटुंबांची क्रमवारी
अंबानी कुटुंब : 99.6 अब्ज डॉलर संपत्तीसह 8व्या क्रमांकावर आहेत. अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्या रिलायन्स इंडस्ट्रीज चालवतात, जी वेगाने विस्तारत आहे.
मिस्त्री कुटुंब : 41.4 अब्ज डॉलर संपत्तीसह 23 व्या क्रमांकावर आहे. मिस्त्री कुटुंबीय पाच पिढ्यांपासून शापूरजी पालोनजी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत.
जागतिक अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत वाढ
ब्लूमबर्गच्या अहवालात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 406.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. वॉल्टन कुटुंबाचे हे वाढते वर्चस्व आणि भारतीय कुटुंबांची क्रमवारी हे स्पष्ट करते की, जागतिक स्तरावर आर्थिक शक्तीचे केंद्र सतत बदलत आहे.