महूद ता. सांगोला येथे सुमारे २३ लाख २६ हजार किंमतीचे सोने जप्त
सांगोला पोलीसांची कारवाई; एक जणाविरोधात गुन्हा दाखल
सांगोला : प्रतिनिधी :-
महूद ता. सांगोला येथील एका ज्वेलर्समध्ये सोने विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या व्यक्तीस सांगोला पोलिसांनी ताब्यात घेत , त्याच्याकडून सुमारे २३ लाख २६ हजार २५० रुपये किंमतीचे ४२६ ग्रॅम वजनाची १६.९९ कॅरेट सोन्याचे लगड जप्त केला आहे. याप्रकरणी दिनांक १७ डिसेंबर रोजी पो. हे. कॉ. अस्लम काझी यांनी अतुल सुरेश धोत्रे रा. गार्डी, ता. पंढरपुर जि. सोलापूर याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १७ डिसेंबर रोजी फिर्यादी पोलीस काझी हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कटफळ दुरक्षेत्र अंतर्गत महुद येथे एका गुन्ह्याच्या तपासावर गेले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयीत इसम हा राजमुद्रा ज्वेलर्समध्ये सोने विक्री करता आलेला आहे.
तेव्हा सदर ठिकाणी पोलीस गेले असता, बातमीदाराने राजमुद्रा ज्वेलर्स येथून बाहेर येत असलेल्या इसमाकडे बोट करून दाखविले.
सदर इसमाकडे पोलिसांनी चौकशी केली असता, तो अडखळत बोलू लागला, यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता १०० रुपयांच्या ४ नोटा तसेच सुमारे ४२६ ग्रॅम वजनाची पिवळ्या धातुची लगड मिळून आली.
सदरची पिवळ्या धातुची लगड कोठून चोरलेली आहे काय ? किंवा कोणाची आणली आहे काय ? ती विकण्यासाठी आला होतास काय ? याबाबत विचारले असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्याचे मालकी हक्क व पावत्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, पावत्या नसल्याचे सांगितले.