महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पाच जण शर्यतीत
मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी प्रचंड घसरल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा पटोले यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबद्दल गोंधळ आहे. या पदाच्या शर्यतीत 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये विश्वजीत कदम,यशोमती ठाकुर,सुनील केदार,विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.
गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यातच नाना पटोले यांनी विधिमंडळात गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यामुळे सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. आता यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
विधिमंडळ गटनेतेपदला वडेट्टीवारचा विरोध
नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास राजी झाले असले तरी ते आता विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यातून तसे संकेत मिळाले होते. नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेता करण्याची चर्चा मी ऐकलेली नाही. तो निर्णय हायकमांड करेल. दिल्ली निर्णय घेईल. 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहे. त्यांच्यासोबत चर्चा होईल, हा निर्णय नाना पटोले यांचा नाही किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. प्रभारी येतील तेव्हा कोणाला गटनेता करायचं याचा निर्णय होईल. तो निर्णय नाना पटोलेचाही नाही आणि विजय वडेट्टीवार यांचाही नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.