प्रेयसी शिक्षिकेला भाेसकून मारले, आरोपीस जन्मठेप
नाशिक : प्रेमप्रकरणातुन शिक्षिकेच्या घरात जाऊन चाकुने वार केले व स्वत: अंगावर वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात मुकेश गोपाळ साबळे रा.कसबापेठ, पुणे यांस दोषी ठरविण्यात येऊन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी.पवार यांनी साबळे यांस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
लासलगांव ता.निफाड येथे पिडीत महिला भाड्याच्या खोलीत राहुन वळदगांव ता.येवला येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणुन काम करत होत्या. दि.४ जुलै २०१४ रोजी पिडित महिला राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतील मालक सुनंदा शिसव यांनी रुपेश वडनेरे यास वरील मजल्यावर पीडितेस कोणीतरी मारत असल्याचे सांगितले नंतर रुपेश वडनेरे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर घरात पिडित शिक्षिकेच्या गळ्यावर व कंबरेवर वार होऊन ती रक्ताचे थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आरोपी मारेकरी मुकेश साबळे यांस कोंडुन घेत लासलगांव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पिडित शिक्षिकेचा मारेकरी कोंडलेला घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र, मारेकरी मुकेश साबळे याने दरवाजा आतमधुन बंद केलेला होता. त्यानंतर दरवाजा तोडुन पोलीस आत गेले त्यावेळी मारेकरी आरोपीने स्वत: वर वार करुन घेतल्याने तो बेशुद्द तर पिडीत शिक्षिका मयत अवस्थेत आढळून आले.
घटनास्थळावरुन कोयता, सुरा व चिठ्ठी जप्त करण्यात आली होती. याबाबत लासलगांव पोलीस ठाण्यात रुपेश वडनेरे यांचे फिर्यादीवरुन आरोपी मुकेश गोपाळ साबळे याचे विरुध्द भा.द.वि कलम ३०२, ३०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या तपासाअंती प्रेमप्रकरणातुन हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारीपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुषमा बंगले यांनी फिर्यादी, तपास अधिकारी विनोद पाटील यांचेसह एकुण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पो.हवा.विजय पैठणकर यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी – पुराव्यावरुन न्यायाधीश बी.डी.पवार यांनी आरोपी मुकेश साबळे यांस भा.द.वि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास, भा.द.वि कलम ३०९ अन्वये ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.