महाराष्ट्रराजकारण

“प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका

बीड : बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असल्याचे सांगून परळी पॅटर्नचाही उल्लेख सुरेश धस यांनी केला. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला.

आमदार धस म्हणाले की, अभिनेत्री प्राजक्ता माळी या आमच्याकडे येतात. प्राजक्ता ताईंचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले. बीड जिल्ह्यात ‘आकां’ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. ‘आकां’कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आम्ही परळीत बघत असतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात.

ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले. सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केले.

आमदार सुरेश धस म्हणाले, बीडमधील टेंभूर्णी गावाच्या तिकडे एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले. 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन एका व्यक्तीच्या नावावर जर झाले असेल तर याच्यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे तुम्हीच सांगा, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठा घोटाळा –
आमदार सुरेश धस म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रकरणात काम करणारे दोन अधिकारी होते, मी काही नाव सांगत नाही. एसपी साहेबांना मी नावे सांगितली आहेत. एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचशे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयात घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात झालेला आहे. यावर चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले आणि निष्क्रिय अधिकारी यात आणले, आरोपींचे जामीन करून देणे वगैरे काम सुरू आहे. तसेच या प्रकरणाची मलेशियामध्ये सुद्धा लिंक आहे. अशा गंभीर गुन्ह्यात सुद्धा अतिशय चुकीचे वागणारे पोलिस ठेवण्यात आले आहेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलिस दल हे निष्क्रिय स्वरूपाचे दाखवले गेले.

आमदार सुरेश धस म्हणाले, मी माझे लेखी पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील पोलिसांची यादी मला द्या आणि त्यात यादीमध्ये बीड जिल्ह्यातील पोलिसांची संख्या बिंदु नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर हे चूक आहे, हा अन्याय आहे आणि हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल. त्याच्यावर योग्य ती कारवाई मुख्यमंत्री करतील. पुढे ते म्हणाले कोणी तरी यांच्या पाठीमागे आहे. आका सोडून कोण आहे यांच्या मागे. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्यात आका.

आकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या –
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले, आकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. शिरसाळा येथे सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधण्यात आले आहेत म्हणून त्याचे अद्याप उद्घाटन होऊ शकले नाही. कोणी जर त्यावर तक्रार केली तर ते सगळे डीमोलिश होऊ शकते. माझ्या मते 1400 एकर आसपास गायरान जमीन शिरसाळा गावात आकांचे बगलबच्चे आहेत. 600 विटभट्ट्या तिथे आहेत त्यातील 300 वीटभट्ट्या या अनधिकृत असून गायरान जमिनीवर आहेत. तिथे एक मंदिर आहे देवीचे. तिथे आता जायलाच जागा राहिली नाही. तिथे बंजारा समाजाची जमीन होती, त्यांना तिथून उठवून यांनी तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याचे आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 24 तासात या पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत आहे. ते याप्रकरणात मुख्य आरोपी आहेत, असा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणी हिवाळी अधिवेशना वाल्मिक कराड यांच्यावर कारवाईची मागणी केली. धनंजय मुंडे त्यांना पाठिशी घालत असल्याचे आरोप केले. हत्या प्रकरणानंतर दररोज सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर नवनवे आरोप करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button