मुख्यमंत्री आरोपींना सांभाळण्याचं काम करतायत : मनोज जरांगे
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण आज मोर्चा
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन 19 दिवस झाले असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी, “बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने आजचा मोर्चा आहे. संतोष भैया देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की, एकाने पण घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना जाग आणणार आहे. संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाच्या पण बापाला येऊ द्या. मॅटर मात्र मी दाबू देणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी,”यात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महविकास आघाडी असो, कुणीही राजकारण करू नये. लाजा वाटू द्या. तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागले आहे. काही मंत्री आहेत, काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवरती आरोप करणे बंद करा. संतोष भैय्याचा खून झाला आहे, याचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी करू नये. गृहमंत्र्यांनी यात हलगर्जीपणा करू नये. आरोपींना लवकर सापडून आणा, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर टीका त्यांनी केली.
तसेच “राज्यात आरोपी 24 -24 तासात सापडत असतो. तुम्हाला 19 दिवस सापडत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. आरोपींना सांभाळण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. तर मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कुणाचा खून झाला असता तर त्यांना झोप आली असती का? तुमची कोणी ताई असती तर दोन्ही उपमुख्यमंत्री झोपले असते का? असा सवाल देखील मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
त्यासोबत मनोज जरांगे यांनी,”सत्ताधाऱ्यांनीच आरोपींना लपवून ठेवला आहे का? अशी शंका येत आहे. आता हे लोन राज्यभर पसरणार आहे. राज्यभर आम्ही मोर्चे काढणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा. राज्यभर मोर्चे सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले. सरकार आल्यापासून मुलींचे खून होऊ लागलेत. तुम्ही आल्यापासून खंडण्या मागू लागलेत. निवडणुकीत खूप खर्च सुरू आहे का? गुंडाच्या हाताने राज्य चालवायचे आहे का? गृहमंत्री या कडे का लक्ष देत नाहीत?” असे काही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.