प्राजक्ता माळी वक्तव्यप्रकरणी अमोल कोल्हे यांनी केली सुरेश धसांची पाठराखण
मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या नावाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर टीका करून कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र खासदार अमोल कोल्हे सुरेश धस यांचे वक्तव्य हे इव्हेंट पॉलिटिक्सबाबत असल्याचे सांगून धस यांची पाठराखण केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आमदार सुरेश धस आक्रमक बनले आहेत. यादरम्यान त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर भाष्य करताना त्यांनी काही महिला सेलिब्रिटींची नावे घेतली. ज्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीचाही उल्लेख होता.
यापार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच धस यांनी माफी मागवी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
अमोल कोल्हे काय म्हणाले ?
“आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सबाबत ते वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला वेगळं वळण देण्याची गरज नाही, असं मला वाटतं. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही. पण पुराव्यांशिवाय कोणावरही शिंतोडे उडवता कामा नये. धस यांच्या वक्तव्यावरून मला जेवढं समजलं त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंट पॉलिटिक्सबाबत वक्तव्य केलं होतं. यापलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो फक्त अभिनेत्रीच काय तर कोणाच्याही बाबत होता कामा नये”, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.
‘संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे’
देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, सरकारमधील एका मंत्र्यावर सातत्याने असे आरोप होत असतील आणि संशायचे धुके बाजूला होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. नेत्यांनी काही नावे समोर आणली असली तरी यात जे कोण आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी अपेक्षा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, “बीडमध्ये निघालेल्या मोर्चातून हेच दिसते की, सर्वसामान्य जनता जागरूक आहे. राजकीय आशीर्वादापोटी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता ते सहन करणार नाही. लोकांच्या मनात जे संशायचे धुके निर्माण झाले आहे, ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्यांनीच शंकाचे निरसन केले पाहिजे,” अशी मागणीही अमोल कोल्हे यांनी केली.
सुरेश धस यांचे विधान
सुरेश धस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमच लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही”, असे विधान सुरेश धस यांनी केले होते.