मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतू मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडले नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींची संपत्ती त्वरित जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले आहेत. बीडमधील बंदुकीच्या परवान्यांच्या संख्येवरूनही राजकारण तापले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो समोर आले आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीच्या परवान्यांचा फेरआढावा घ्या’, असे आदेश देखील दिले आहेत.
दरम्यान, या घटनेतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, दुसरीकडे या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा खून करण्यात आला असून, याबाबत आपल्याला फोन आला होता, असा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.