नाशिकामध्ये जागेच्या वादातून मामानेच केली भाच्याची हत्या, तिघे अटकेत
नाशिक : जागेच्या मालकी हक्काच्या वादातून २१ डिसेंबर रोजी जव्हार रोडवर जागा मालक भाच्याची गाेळ्या झाडून खून करणाऱ्या मामासह पसार असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निलेश परदेशी यांचा खून मामा गोविंद दाभाडे व इतर संशयितांनी गोळ्या झाडून केला होता.
ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे (२५), विठ्ठल सोनू बदादे (३०, दोघे रा. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर) व सुरेंद्र अनंता जोगारे (२४, रा. मोखाडा, जि. पालघर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. जव्हार रोडवरील भगवती नगर कमानी जवळ निलेश रामचंद्र परदेशी (रा. त्र्यंबकेश्वर) यांचा गोळ्या झाडून २१ डिसेंबरला खून करण्यात आला. जागेच्या वादातून निलेश यांचा मामा गोविंद दाभाडे यांनी हा खून केल्याचा आरोप झाला.
त्यानुसार पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पेठ उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तपास करीत सुरुवातीस गोविंद दाभाडे यास पकडले. त्यानंतर इतर संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम राबवली. ग्रामीण भागातील पाड्यांवर जात चौकशी केली. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोखाडा व अंजनेरी शिवारातून तिघांना पकडले. तिघांनी निलेशच्या खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.