भारतराजकारण

दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधीच्या गालाप्रमाणे बनवू : भाजप उमेदवाराचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आप आणि काँग्रेसनंतर आता भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय दिल्लीत वादग्रस्त विधानांनीही वातावरण तापत आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रमेश बिधूडी यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे, ज्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान रमेश बिधूडी म्हणाले की, “लालू यादव खोटं बोलायचे की ते बिहारच्या रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालांप्रमाणे बनवतील. पण ते तसं करू शकले नाहीत. मात्र, मी तुम्हाला आश्वस्त करतो की, कालकाजी सुधार शिबिरासमोरील आणि आतील सर्व रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू.”

त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की, “जसं ओखला आणि संगम विहारमधील रस्ते तयार केले तसेच कालकाजीचे रस्ते तयार करू.” बिधूडी यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, आणि याच विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे वर्तन खालच्या पातळीचे : पवन खेड़ा
काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी रमेश बिधूडी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “ही केवळ या खालच्या पातळीच्या माणसाची मानसिकता नाही तर त्यांच्या वरिष्ठांचे खरे स्वरूप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार भाजपच्या अशा नेत्यांमध्ये दिसून येतात.”

भाजपचे खरे रूप – सुप्रिया श्रीनेत
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी बिधूडी यांच्या विधानाला महिलाविरोधी ठरवलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “प्रियंका गांधी यांच्याबाबत रमेश बिधूडी यांनी दिलेलं विधान केवळ लाजिरवाणं नाही, तर त्यांची महिलांविषयीची नीच मानसिकता दर्शवते. पण ज्या व्यक्तीने संसदेत आपल्या सहकारी खासदाराला नालस्ती केली आणि त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही, त्याच्याकडून दुसरं काय अपेक्षित असणार?”

त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधत लिहिलं की, “हे भाजपचे खरे रूप आहे. भाजपच्या महिला नेत्या, महिला आणि बालविकास मंत्री, नड्डा साहेब किंवा स्वतः पंतप्रधान या खालच्या दर्जाच्या भाषा आणि विचारांवर काही बोलतील का? प्रत्यक्षात, महिला विरोधी विचारांचा पाया मोदींनीच घातला आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून दुसरं काय अपेक्षा ठेवायची? या नीच विचारांसाठी माफी मागावी.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button