नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीत गोध्रा रेल्वे अग्निकांड हा महत्त्वाचा अध्याय आहे. त्यानंतर उसळलेल्या दंगलीवर मोदींवर बरीच टीका झाली. आजवर त्यांनी या विषयी बोलणे टाळले होते. मात्र झिरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींची नुकतीच मुलाखत घेतली आहे. त्यांच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी 2002 च्या गुजरातमध्ये झालेल्या गोध्रा दंगलीबाबतही भाष्य केले.
फेब्रुवारी 2002 मध्ये अयोध्येहून गुजरातकडे येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसला गोध्रा रेल्वे स्थानकावर आग लावण्यात आली होती. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘आमदार झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच गोध्रामध्ये घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या डोळ्यांनी मी सर्व भायनक दृश्य बघितले.’
निखिल कामथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉडकास्टचा व्हीडिओ 10 जानेवारीला युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी बोलताना ते गोध्रातील घटनेवर पहिल्यांदाच उघडपणे बोलले.
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 24 फेब्रुवारीला पहिल्यांदा आमदार झालो. 27 फेब्रुवारीला पहिल्यांदा विधानसभेत गेलो. आमदार झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गोध्रामध्ये घटना घडली. मी विधानसभेतून बाहेर पडत गोध्राला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, मला सांगण्यात आले की हेलिकॉप्टर उपलब्ध नाहीये. त्यानंतर एक सिंगल इंजिन असलेले हेलिकॉप्टर मिळाले. यातून व्हीआयपी लोकं जाऊ शकत नाही, असे मला सांगण्यात आले. मात्र, मी त्यांच्याशी भांडलो व मी कोणीही व्हीआयपी नसून, सर्वसामान्य माणूस आहे. जे काही होईल त्यांची मी जबाबदारी घेतो, असेही त्यांना सांगितले.
त्यावेळी मी खूप व्यथित होतो. गोध्रामध्ये जे पाहिले ते खूपच वेदनादायी होते. मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही तो त्रास झाला जो एखाद्या माणसाला होऊ शकतो. त्यावेळी जे काही शक्य होते, ते सर्वकाही केले., असेही या पॉडकास्टमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले.
या मुलाखती पंतप्रधानांनी 2008 ला गुजरातमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेवरही भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, 5 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेच्या परिस्थितीची तुम्ही कल्पना करू शकता. त्यावेळी मी माझ्या सुरक्षा रक्षकांना म्हणालो की पोलीस कंट्रोल रुमला जायचे आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांनी नकार दिला. मात्र, मी गाडीत जाऊन बसलो. स्वतःची जबाबदारी पार पाडत जखमी नागरिकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो.