संजय रॉयच्या फाशीसाठी ममता बॅनर्जी अॅक्शनमध्ये, उच्च न्यायालयात करणार अपील
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला फाशीची शिक्षा न दिल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
ममता सरकारने दोषीला फाशीची शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी कोलकाता न्यायालयाने संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “तुम्ही त्याला जन्मठेपेची शिक्षा देत आहात? तो पॅरोल घेऊन बाहेर येऊ शकतो. मी शिक्षेशी सहमत नाही. आम्ही सर्वांनी फाशीची मागणी केली होती, पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण आमच्याकडून जबरदस्तीने काढून घेण्यात आले होते. ते कोलकाता पोलिसांकडे असते, तर त्याला फाशीची शिक्षा मिळेल याची आम्ही खात्री केली असती.”
संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही ठोठावला
यापूर्वी सोमवारी आरजी कार प्रकरणात शिक्षा जाहीर करण्यात आली होती. दुपारी २.४५ वाजता निकाल देताना न्यायालयाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सियालदाह न्यायालयाने संजय रॉय याला ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. सियालदाह न्यायालयाचे न्या. अनिर्बान दास म्हणाले की, हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही. पीडितेच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूबद्दल १० लाख रुपये भरपाई आणि अतिरिक्त ७ लाख रुपये द्यावेत.
संजयला फाशी दिली तरी हरकत नाही, आई मालती रॉय
संजयची आई मालती रॉयने म्हणाल्या की, एक महिला आणि तीन मुलींची आई असल्याने, त्या महिला डॉक्टरच्या आईचे दुःख आणि वेदना मला जाणवते. न्यायालयाने माझ्या मुलाला फाशी देण्याचा निर्णय घेतला, तर माझा आक्षेप नसेल. संजयवरील आरोप खोटे असते, तर मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता. पण, कायद्याच्या दृष्टीने त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे मी त्याला न्यायलय परिसरात भेटायलाही गेले नाही.