
सांगोला (प्रतिनिधी):-
दिनांक ३ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील मिरज रेल्वेगेट नजीक असणाऱ्या व राऊत मळ्याकडे जाणाऱ्या रोडवर आबा राऊत या पिग्मी एजंटास अज्ञात चार लोकांनी अडवून तोंडावर व डोळयात मिरची पुड टाकुन, दुखापत करून सुमारे २५ हजार रुपये असलेली बॅग जबरीने चोरून नेहली होती.
याप्रकरणी सांगोला पोलीसात चार अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. सचिन जगताप यांच्याकडे असून सांगोला पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासाच्या आत मुख्यआरोपी शेखर शशिकांत कारंडे (वय २०) मुळ रा. मठाचीवाडी फलटण ता. फलटण जि. सातारा सध्या रा. सोनंद ता. सांगोला यास बेड्या ठोकल्या आहेत.
सदरचा गुन्हा हा जाणीवपुर्वक दुखापत करून, जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणे कडून दोन पोलीस पथके नेमण्यात आली होती .
पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील स.पो.नि. सचिन जगताप, पो.उपनिरीक्षक विनायक माहूरकर, पो.हे.कॉ. दत्तात्रय वजाळे, पो.हे.कॉ. पलुसकर, पो.कॉ. मारुती पांढरे, आवटे, माऊली शिंदे, सायबर विभाग, सोलापूर ग्रामीणचे पो.हे.कॉ. युसुफ पठाण यांनी गोपनिय बातमीदारमार्फत माहिती प्राप्त करून गुन्ह्यातील मुख्यआरोपी शेखर शशिकांत कारंडे यास फलटण शहर पोलीस ठाणे ता. फलटण येथून ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्ह्याबाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, शेखर कारंडे याने गुन्ह्याची कबुली दिल्याने व सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यास दिनांक ६ मार्च रोजी अटक करण्यात आलेली आहे.
शेखर कारंडे यास मा. न्यायालयामध्ये हजर केले असता, मा. न्यायालयाने अटक आरोपीस ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.