अन् अपक्ष उमेदवारांने पेटवली आपली चारचाकी
नांदेड : आपल्याला जनतेची सहानुभूती मिळावी आिण त्या सहानुभूतीचे मतामध्ये परिवर्तन व्हावे असे प्रत्येक उमेदवारास वाटत असतात. त्यासाठी ते उमेदवार सनासनाटी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र नांदेड मध्ये एका अपक्ष उमेदवाराने सहानुभूती मिळवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यांने स्वतःच चार चाकी वाहन जाळले आणि अज्ञात व्यक्तीने वाहन जाळल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याचा हा खोटा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी उमेदवारासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री सवा सहा वाजेच्या सुमारास मुखेड ते बाऱ्हाळी रोड परसराम दत्ता कदम यांनी पुतण्या अक्षय लहू कदम याच्या मदतीने स्वतः जवळील असलेली टाटा सफारी वाहन क्रमांक ( एमएच २६ एल २७७५) डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञाताने जाळली अशी माहिती दिली.
घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शिवाय अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली. तपासा दरम्यान पोलिसांना मात्र संशय येतं होता. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पुतण्या अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्या दोघांचा बनाव उघडकीस आला.
निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका पुतण्याने दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्याचा पुतण्या अक्षय कदम या दोघा विरोधात कलम २८७, २१७, ३२४(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच समर्थन मिळावे यासाठी उमेदवाराने ही शक्कल लढवल्याची चर्चा आहे. प्रसिद्धीसाठी उमेदवारने अश्या प्रकारे कृत्य केल्याचे उघड झाल्याने मुखेड मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.