महाराष्ट्रराजकारण

डॉ.आंबेडकर आम्हाला देवापेक्षा कमी नाही : डॉ.आव्हाड

मुंबई : राज्यसभेमध्ये काल, मंगळवारी संविधानावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ झाला आहे. अमित शहा यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहा यांच्यासह भाजपाला सुनावले आहे. त्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

‘आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही, पण त्या महामानवानेच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले. मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्यामुळे त्यांचे नाव फॅशन म्हणून घेतले जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते.’, असे म्हणत आव्हाड यांनी अमित शाहांवर निशाणा साधला आहे.

ट्विटरवरील पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला. तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते. अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, आज मागासवर्गीय समाजातील लोकांना पंतप्रधान होता आलं, आदिवासी समाजातील व्यक्तींना राष्ट्रपती होता आलं, माझ्या सारख्या भारतातील तमाम SC, ST, OBC, समाजातील लोकांना मंत्री, खासदार, आमदार होता आलं.’

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या भारतातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल झाले. माणसाला माणूस म्हणून जगता आलं. त्यांच्या संविधानामुळेच या भारताची अखंडता टिकून राहिली, त्यांच्या संविधानामुळेच या देशाला समता-न्याय-बंधुत्वांची शिकवण मिळाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला “देवापेक्षा” कमी नाहीत..! जय भिम..!’, असे म्हणत आव्हाड यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते अमित शहा
संसदेत बोलताना अमित शहा यांनी आंबेडकरांचे नाव घेणे सध्या फॅशन झाली असल्याचे म्हटले होते. ‘सध्या आंबेडकरांचे नाव वारंवार घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात स्थान मिळेल’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी शाहांवर निशाणा साधत माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button