नवी दिल्ली – शुध्द शाकाहारीचा पुरस्कार करणारे अन् जाहिरातीत ठासून सांगणाऱ्या पंतजलीच्या एका उत्पादनात माशांचा अर्क वापरला जात असून हा आमच्या धािर्मक आस्थासाेबत खेळ केला जात असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
पतंजलीच्या दिव्य मंजन या उत्पादनाच्या पाकिटावर हिरव्या रंगाचे वर्तुळाकार चिन्ह दाखवले आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो की, हे शाकाहारी उत्पादन आहे. मात्र प्रत्यक्षात या मंजनमध्ये माशांचा अर्क वापरला जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
याचिकाकर्त्याने तक्रारीत म्हटले की, सदर उत्पादन शाकाहारी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे मंजन वापरत आहोत. वनस्पती आधारित शाकाहारी मंजन असल्याचा आपला समज होता. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनातून पुढे आले की, यामध्ये माशांचा अर्क असलेले समुद्रफेन वापरले जात आहे, असा आरोप दावा याचिकाकर्त्याने केला.
ही याचिका यतिन शर्मा नामक वकिलांनी दाखल केली आहे. ही ग्राहकांची दिशाभूल तर आहेच, त्याशिवाय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचेही उल्लंघन आहे. ही नवी माहिती समोर आल्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला. तसेच आमच्या धार्मिक आस्था आम्हाला मांसाहारी उत्पादने वापरण्याची परवानगी देत नाहीत, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
याचिका स्वीकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद, बाबा रामदेव, केंद्र सरकार आणि दिव्य मंजन उत्पादित करणाऱ्या पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोटीस बजावली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.