क्राइमभारत

उत्पन्न 22 कोटी पण 7640 कोटी कर भरण्याची तयारी; सुकेश चंद्रशेखरचे थेट अर्थमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्याने 2024-2025 या वर्षातील त्याचे परदेशी उत्पन्न जाहीर केले आहे. तसेच कर भरण्याचीही तयारी दर्शवली.

सुकेशवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून त्याच्याविरोधात 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच आता निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून सुकेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांना लिहलेल्या पत्रात सुकेशने त्याच्या परदेशातील व्यवसायाची माहिती दिली आहे. या व्यवसायांमध्ये एलएस होल्डिंग्स इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन यांची अनुक्रमे अमेरिकेत आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स येथे नोंदणी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग व बेटिंगशी संबंधित हे व्यवसाय 2016पासून कार्यरत आहेत. 2024 साली या व्यवसायांनी 2.7 अब्ज डॉलर्सची उलाढाल केली आहे. या व्यवसायाचे कार्यक्षेत्र अमेरिका, स्पेन, इंग्लंड, दुबई आणि हाँगकाँगपर्यंत विस्तारले आहे.

सुकेशने या पत्रात भारतात सुरू असलेल्या आयकर वसूली प्रकरणावर तडजोड करण्याची तयारी दाखवली आहे. त्याने 2024 मधील परदेशातील उत्पन्नावर लागू होणारे भारतीय कर भरण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम 7 हजार 640 कोटी इतकी आहे. सुकेशने ही रक्कम भारतातील टेक आणि अॅडव्हान्स ऑनलाइन गेमिंग बिझनेसमध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ईडीकडून 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तसेच इतर तपास यंत्रणांकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. ईडीने दाखल केलेले प्रकरण हे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आर्थिक गुन्ह्या संदर्भातील आहे.ज्यात रिलिगेअर एंटरप्रायजेसच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नी जपना सिंग आणि अदिती सिंग यांची फसवणूक आणि खंडणी वसूली संबंधित आहे. या दोघांनाही रिलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडमधील निधी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.

भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) आणि प्राइज चिट्स आणि मनी सर्कुलेशन स्कीम्स (बंदी) कायद्याच्या काही कलमांखालील गुन्ह्यांसाठी सुकेशला 29 मे 2015 रोजी अटक करण्यात आली होती. याबरोबरच अनेक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमुळे सुकेश सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button