मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. मात्र, कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला सरेंडर केलं आहे. यानंतर वाल्मिक कराडबाबतच्या सगळ्या बाबींची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहेत.
कराड याची पिंपरी-चिंचवड आणि हडपसर भागात मालमत्ता असल्याचे समोर आले. यानंतर वाल्मीक कराडच्या आर्थिक व्यवहारामध्ये मधस्थी केल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपच्या एका माजी नगरसेवकाची सीआयडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी सीआयडी पोलिसांनी केल्यानंतर खाडे यांनी याबाबत माध्यमांना आपली प्रतक्रिया देत वाल्मिक कराडसोबत मी कधीही फोनवर बोलले नाही, असे सांगत दत्ता खाडे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
खाडे दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते. कराडने त्याची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावावर पुण्यात जमिनी खरेदी केली होती. या जमिनीच्या व्यवहारामध्ये खाडे यांनी मध्यस्थी केली असल्याचा संशय सीआयडीला होता, या संशयातून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
त्याचा आणि माझा अजिबात संबंध नाही
वाल्मिक कराड आणि त्यांचे कुणीही नातेवाईक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांचा आणि माझा अजिबात संबंध नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना मी उत्तरे दिली. त्यांचे समाधान झाल्यावर त्यांनी मला जायला सांगितले, असल्याची प्रतिक्रिया खाडे यांनी माध्यमांना बोलताना दिली. तसेच ज्यावेळी चौकशीसाठी गरज भासेल त्यावेळी मी आपल्याला सहकार्य करेल, असे पोलिसांनी सांगितल्याचे खाडे यांनी सांगितले.
एफसी रस्त्यावरील गाळ्याच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. अथिकाऱ्यांनी मला बोलावून घेत काही प्रश्न विचारले. गाळ्याचे पैसे कमी करण्यासाठी मी कुणाला फोन केला होता का? मी स्वःताह गेलो होतो का? याबाबत माझ्यापेक्षा पोलिसांना बिल्डर अधिक माहिती देऊ शकेल. खरंच या प्रकरणात मला कसलीही माहिती नाही आणि माझा लांब लांब पर्यंत संबंध नसल्याचे खाडे यांनी सांगितले.
ज्या भागात वाल्मिकने त्याच्या पत्नीसाठी प्रॉपर्टी घेतली, त्या भागात मी नगरसेवक असल्याने त्यात माझाही सहभाग असेल, असा पोलिसांना संशय होता. परंतु माझी आणि वाल्मिकची केवळ तोंडओळख होती. यापलिकडे आमचे आणि त्यांचे कुठलेही संबंध नाहीत.