जरांगे पाटील घेणार देशमुख अन् सूर्यवंशी कुटूंबियांची भेट
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण अलीकडे चर्चेत आहे. अलीकडेच शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तर अजित पवारांनीदेखील देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यापाठोपाठ आता मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील हे देशमुख यांच्या कुटूंबियांना भेटणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील उद्या 12 वाजता परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. दुसरीकडे ते परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाची देखील भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील उद्या 12 वाजता परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आज रात्रीचा मुक्काम परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यातील दामपुरी येथे असणार आहे. त्यानंतर ते उद्या सकाळी 9 वाजता आलेगाव आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता परभणी येथे जाणार आहेत. ते तिथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
दरम्यान उद्या दुपारनंतर मनोज जरांगे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिले. तसेच याचा घटनाक्रम सांगत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. या घटनेवरून सध्या वातावरण चांगलंच तापलं असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.