धनजंय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक लागेबांधी, दमानियांची पुरावेसहित पोस्ट
मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने समोर येत असून तोच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे.
आता या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी ट्विट करुन मुंडे आणि कराड यांच्या जमिनीचा सात बारा शेअर केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
अंजली दमानिया यांची पोस्ट
मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी डिजिटल सात बारा शेअर केला आहे. पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन ! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र , जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले. ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे).” असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी २८ तारखेला त्या ठिय्या आंदोलन करणार आहे.
पंकजा मुंडे गप्प का : दमानियांचा संताप
मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही गप्प का? तुम्ही बीडच्या मंत्री आहात. ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवान गडावरुन बोलला होतात. त्या व्यक्तीचा खंडणीच्या गुन्ह्यात सरळ सरळ सहभाग आहे. याशिवाय संतोष देशमुख खूनप्रकरणातही त्याचा हात आहे की नाही, यावर तुम्ही चकार शब्दही बोलत नाहीत. बीडच्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही यावर भूमिका घ्यायला हवी, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं. संतोष देशमुख यांच्या शवविच्छदेनाच्या अहवालानंतर त्यांचे फोटोही समोर आले, ते फोटो पाहून थरकाप उडाला. त्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात हे घाणीचं राजकारण, दहशतीचं राजकारण होत आहे ते थांबायला हवं. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं सख्य कसं आहे समोर आलंय. वाल्मिक कराड यांचे फडणवीसांपासून ते रोहित पवारांसोबत फोटो आले आहेत. या वाल्मिक कराडची बीडमध्ये दहशत आहे हे सगळेच सांगतात. मग, ही कसली दगडाची लोकशाही का? असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.