नवाब मलिकची कन्या अन् स्वरा भास्करचे पती आमनेसामने
मुंबई : नवाब मलिक यांना भाजपाचा विरोध असल्याने अजित पवारांनी मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. सना यांनी अणुशक्तीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. सना यांची लढत अिभनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्याशी होणार आहे. अर्ज भरताच सना यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला जोरदार टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे. अणुशक्तीनगरमधून स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे स्वरा भास्कर आणि सना मलिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
“नवीन मुलाला संधी! फहादला ही संधी दिल्याबद्दल शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे मॅम, अखिलेश यादवजी यांचे आभार. तो तुम्हाला निराश करणार नाही”, असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटले होते. याला सना मलिक यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
सना यांनी म्हटले की, नवाब मलिक यांची मुलगी असल्याचा मला गर्व आहे. कोणत्याही अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी म्हणून अणुशक्तीनगरची मुलगी बनली तर कधीही चांगले, असे प्रत्त्यूत्तर सना यांनी दिले आहे. नवाब मलिक यांनी या भागात काम केलेले आहे. मला रॅलीमध्ये जे समर्थन मिळाले आहे ते त्याचे प्रमाण आहे, असे त्या म्हणाल्या.
शरद पवार गटाने पॅराशूट लावून लँड झालेल्या उमेदवाराला माझ्याविरोधात उतरविले आहे. हे राजकारण आहे, कोणतीही दुश्मनी नाही. सध्या ते विरोधात आहेत. यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही, असे सना यांनी स्पष्ट केले. हे लोक मला नवाब मलिक यांचीच मुलगी म्हणून ओळखत नाहीत, तर मी या लोकांच्या घरी जाते, चहा पिते, त्यांच्या समस्या जाणते, असे सना यांनी सांगितले.