वृद्ध महिलेचा खून करून दागिने केले लंपास
राहुरी । राहुरी तालुक्यातील मांजरीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी काही तासातच राहुरी पोलीस पथकाने महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.
सुमन सावळेरराम विटनोर असे या म्रत महिलेचे नाव आहे. त्या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या उशीरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता. तेव्हा त्यांना मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागीने ओरबडून नेल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुरज गायकवाड, अशोक शिंदे, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक फुंदे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले.
मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप ऊर्फ संजू चोपडे यांचा याप्रकरणी हात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला उसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढून घेतले. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील साडी काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.
आरोपी संदीप उर्फ संजू अशोक चोपडे (वय ३५ वर्षे रा. मळहद्द, मांजरी, ता. राहुरी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.