राजकारण

बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतके मराठा समाजाची मते : बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त विधान

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वासर्वे मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले. मात्र, त्यांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा असे म्हटले आहे. जरांगे पाटील हे उघडपणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत असतात. त्यामुळे भाजपचे उमेदवार हे आकस बाळगून असतात. त्याचा प्रत्यय जालन्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत, असे धक्कादायक विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

जालन्यातील एका गावामध्ये प्रचार सभेत ते बोलत होते. या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. बबनराव लोणीकर म्हणाले की, “या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत. मात्र हे गाव सर्व समाजाचे गाव आहे. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात,” मराठा समाजाबाबत केलेल्या या वक्तव्याने लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या वक्तव्यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बबनराव लोणीकर हे परतूर मंठा विधानसभेचे भाजपचे उमेदवार आहेत. परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये बबनराव लोणीकरांकडून प्रचार सुरु होता. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले.

या विधानावरुन राजकारण तापल्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी आपल्या सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘आज आष्टी गावात अभूतपुर्व रॅली झाली. या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झाले होते. खेड्यापाड्यातील ३ हजार पेक्षा जास्त लोक आले होते. यावेळी आष्टीचे कौतुक करताना मी या गावात मराठा समाजाची मते कमी आहेत. हे गाव अठरा पगड जातीचे असणारे गाव आहे. ४० वर्ष या गावाने भारतीय जनता पक्षाला लीड दिले. मात्र काँग्रेसमधील हकालपट्टी केलेल्या काही जणांनी मोडतोड करुन व्हिडिओ समोर आणला, तो खोटा आहे,” असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.

“मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मते भाजपला मिळतात. मला अठरापगड जातीचे लोक मला २५ हजारंच्या मताधिक्याने निवडून देतात. कारण मी काम करतो, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी चुकीचा व्हीडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,” असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button