भारतराजकारण

संभल भेटीसाठी निघालेल्या राहुल-प्रियंका गांधीना सीमेवरच रोखले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवरील गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर बुधवारी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या संभल दौऱ्यामुळे गाझीपूर गेटवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. गाझीपूर गेटवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आले. पोलीस तपासणी करून वाहनांना पुढं जाण्यास मज्जाव करत आहेत. दिल्लीहून गाझियाबादकडं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 च्या सर्व लेनवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर पोहोचले. आंदोलन सुरू होताच दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. इंदिरापूरमचे सहायक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, नागरिकांच्या सोयीसाठी पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस जवान सातत्यानं प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी संभाल न्यायालयाने शहरातील कोट पूर्व परिसरात असलेल्या मुघलकालीन जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि त्याच दिवशी एका पथकाने तेथे सर्वेक्षण केले. तेव्हापासून वाद निर्माण झाला होता. २४ नोव्हेंबर रोजी संभलमधील जामा मशिदीबाहेर स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती.

न्यायालयाने जामा मशि‍दीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम येथे आली. त्यावेळी ही घटना घडली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले होते. हिंसाचारानंतर चार दिवस बाजारपेठा बंद होत्या. संभल प्रशासनाने सुरक्षा वाढवून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

पप्पू यादवही राहुल गांधींसोबत आहेत. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी संविधान वाचवण्यासाठी आणि द्वेष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी आणि योगी यांच्यातील हे युद्ध आहे. पंतप्रधान कोण होणार, उद्या काय होणार? ही लढाई आहे हिंदू सम्राट होण्यासाठी आहे.’ दरम्यान, आता दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने कॉँग्रेस काय रणनीती आखणार हे पहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button