राजगुरुनगर व लोणावळा प्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार : रुपाली चाकणकर
पुणे : राजगुरूनगर व लोणावळा येथील घटना ही दुर्दैवी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल. आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेऊन दोन्ही मुलींवर अत्याचार करून हत्या केली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आणि त्यांची सर्व टीम चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आहे. 25 तारखेला ज्या घटना पुणे जिल्ह्यात घडल्या त्या दोन्ही घटना मन हेलवणाऱ्या आहेत. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल. राज्य महिला आयोगाकडून आरोपीला फाशी व्हावी, अशी मागणी आम्ही करू, असे राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
समाजात विकृती वाढत चालली आहे. पोलीस प्रशासन अणि शासनाने या दोन्ही घटनांमध्ये चांगलं काम केलं आहे. राजगुरूनगर प्रकरणातील आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा आहे. 9 वर्षांपासून तो तिथं राहत होता, तो त्यांच्या ओळखीचा होता. पोलिसांनी यात चांगली कामगिरी करत आरोपीला अटक केली. रात्री पावणेबाराच्या सुमारास मृतदेह आढळून आले होते. अवघ्या 4 तासांत आरोपीला अटक केली आहे. आरोपींवर अनेक कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच कुटुंबाला राज्य सरकारकडून आर्थिक साह्य दिलं जाईल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा फायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या केली. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यामुळे त्या मुली त्या ठिकाणच्या भागांमध्ये लग्न असेल किंवा इतर कोणत्या धार्मिककार्य असेल तर जातात.
राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करून या अगोदर देखील कोल्हापूरच्या गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली. कल्याणमधील जो आरोपी आहे त्या आरोपीवरही यापूर्वी देखील गुन्हा दाखल झाला होता. पण ऑटिझम सर्टिफिकेट दाखवून त्यावेळेस ती पळवाट काढण्यात आली होती.
दरम्यान, मी त्यांना प्रामुख्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करतेय की ऑटिझम ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांची परत एकदा पडताळणी करावी आणि ऑटिझम सर्टिफिकेट वरती कोणालाही त्या पद्धतीने दिलासा दिला जाऊ नये.
…त्याचं उत्तर जनतेनं दिलं
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काय होईल, अजित पवारांचे काय होईल असा प्रश्न विचारला जायचा त्याचं उत्तर जनतेनं दिलं आहे, पालकमंत्री पदाचा विषय सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, आमचं महाविकास आघाडीसारखं नाही, वादाचा विषय आम्ही घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.