संशोधक विद्यार्थ्यांकडे पाच लाखाची मागणी करून ५० हजार स्वीकारले
रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाच्या पीएचडी मार्गदर्शक प्राध्यापिकेसह चौघांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयामध्ये पीएचडी संशोधक विद्यार्थ्याला महाज्योती फेलोशिप मंजूर झाल्याने दरमहा ५० हजार ४०० रुपये मिळतात. त्यासाठी रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाच्या मार्गदर्शक असलेल्या महिला प्राध्यापिकेने प्रोग्रेस रिपोर्ट, हजेरी पत्रक आणि एचआरएच्या कागदपत्रांवर सही करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून मुलामार्फत ५० हजार रुपये स्वीकारले. त्याला एसीबीच्या पथकाने मिलकॉर्नर येथील ईआरएस कोचिंग क्लासेस येथे रंगेहात पकडले.
रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्राध्यापिका डॉ. एराज सिद्दीकी असे मुख्य आरोपीचे तर ग्रंथालय परिचारक शेख उमर शेख गाणी (५२), ईआरएस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचा सहायक संचालक डॉ. सिद्दिक फैसोद्दीन उर्फ समीर रियाजोद्दीन (३६) आणि संचालक सिद्दीकी फराज रियाजोद्दीन (३१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी संशोधक विद्यार्थी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयामध्ये विद्यावाचस्पती (पीएचडी) करीत आहे. त्याला संशोधनासाठी विद्यापीठाकडून संशोधक मार्गदर्शक म्हणून डॉ. एराज सिद्दीकी (ग्रंथपाल, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) म्हणून दरमहा ५० हजार ४०० रूपये मिळत आहेत. ही फेलोशिप मिळण्यासाठी तक्रारदार यांना त्यांचे प्रोग्रेस रिपोर्ट, स्वयं घोषणापत्र, हजेरी पत्रक, एचआरए प्रमाणपत्र, तिमाही आणि सहामाही प्रोग्रेस रिपोर्ट यावर गाईड डॉ. एराज सिद्दीकी हिची स्वाक्षरी लागते. त्यानंतर ते कागदपत्र विद्यापीठात सादर केले जातात. त्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी तसेच तक्रारदाराचे रिपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी डॉ. एराज सिद्दीकी हिने दरमहा १० हजार रुपये प्रमाणे लाच मागितली. विद्यार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे धाव घेतली. प्रोग्रेस रिपोर्टवर डॉ. एराज सिद्दीकी हिच्या सह्या मिळवून देण्यासाठी डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातील ग्रंथालय परिचारक शेख उमर यानेही २४ जुलै रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर २७ जुलै रोजी डॉ. एराज सिद्दीकी हिने तिचा मुलगा डॉ. सिद्दीकी मोहंमद फैसोद्दीन याची भेट घ्यायला सांगितली. २९ जुलै रोजी विद्यार्थ्याने त्याची भेट घेतली असता त्यानेही संशोधन प्रगती अहवालासह (आरएसी) सर्व कागदपत्रांवर सह्या करून देण्यासाठी नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या चार वर्षांत मिळणाऱ्या फेलोशीपमधून महिन्याला १० हजार रुपयांप्रमाणे पाच लाख रुपये लाच म्हणून देण्याची मागणी केली. तेव्हा विद्यार्थ्याने डॉ. एराज सिद्दीकीला फोन केला असता तिचा मुलगा सांगेल त्याप्रमाणे पैसे देण्यास सांगितले. पहिल्यांदा ग्रंथालय परिचारक त्यानंतर मार्गदर्शक डॉ. एराज सिद्दीकीचा मुलगा यांच्याकडे लाचेच्या मागणीची चारवेळा पडताळणी करण्यात आली. डॉ. एराज सिद्दीकी हिच्यासह तिघांनीही लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर १९ आॅगस्टला ५० हजार रुपये स्वीकारण्यासाठी डॉ. एराजने तिच्या दुसऱ्या मुलाला सांगितले. त्याप्रमाणे मिलकॉर्नर भागातील ईआरएस कोचिंग क्लासेस येथे दुसरा मुलगा सिद्दीकी फराज याने ५० हजार रुपये स्वीकारले. तेथेच जालना येथील एसीबीचे निरीक्षक शंकर मुटेकर, अंमलदार गजानन घायवत, गजानन खरात, शिवाजी जमधडे, गणेश चेकें, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, जावेद शेख, भालचंद्र बिनोरकर, विठ्ठल कापसे, कुंटे यांच्या पथकाने त्याला पकडले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.