डिलेव्हरी बॉयला अमानुष मारहाण करणारा मुजोर पोलीस निलंबित
सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन मागविले पार्सल पाऊस सुरु असल्याने देण्यास उशीर झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याने डिलिव्हरी बॉयला अमानुषपणे काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अविष्कार कॉलनीत घडली. जीवन शेजवळ असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत त्याचे निलंबन केले असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी दिली.
फिर्यादी जितेंद्र लक्ष्मण मानके (३०, रा. एन ६ सिडको) हा वर्तमान पत्र वाटप करण्याचे काम करतो. टीव्ही सेंटर चौकात त्यांची पेपरची एजन्सी आहे. तसेच तो गेल्या सहा महिन्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पार्टटाइम म्हणून ऑनलाईन पोर्टलच्या ऑर्डर डिलेव्हरीचे देखील काम करत आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास इ कॉम एक्स्प्रेस मयुरपार्क येथे त्याच्याकडे ऑनलाईनचे ८३ पार्सल वाटप करण्याचे काम आले होते. जितेंद्र पार्सल घेऊन निघाला, साडेदहाच्या सुमारास आरोपी पोलीस कर्मचारी जीवन शेजवळ याचा फोन आला. तेव्हा जितेंद्र याने त्याला आताच पार्सल वाटप करीत आहे. पाऊस सुरु असल्याने थोड्यावेळात तुमचे पार्सल आणून देतो असे सांगितले. त्यानंतर देखील शेजवळ याने चार वेळा फोन केले. तेव्हा देखील जितेंद्र याने पाऊस सुरु असल्याने थोड्या वेळात पार्सल देतो असे सांगितले होते. त्यामुळे शेजवळ हा चांगलाच संतापला होता. त्याने जितेंद्र याला काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.
फायबरच्या काठीने अमानुष मारहाण
जितेंद्र याने दुपारी अडीचच्या सुमारास अविष्कार कॉलनी येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानजवळ येऊन पोलीस कर्मचारी जीवन शेजवळला फोन करून पार्सल घेण्यासाठी बोलावले. तेव्हा जीवन हा हातात पोलिसांसाठी असलेली फायबरची काठी घेऊनच आला. त्याने हरामखोरा माजला का, इतक्या उशिरा पार्सल आणतो का असे म्हणत त्याला काठीने पाठीवर, डोक्यावर, ओठावर, पायावर अमानुषपणे सपासप मारहाण सुरु केली. ओठातून रक्त निघाले. जितेंद्र चक्कर येऊन पडला. तेव्हा लोकांनी त्याला शेजवळच्या तावडीतून सोडवून खाजगी रुग्णालयात भरती केले.
अंग सुजले, ओठही फाटला
जितेंद्र याला जीवन शेजवळ याने अमानुषपणे काठीने मारहाण केल्याने त्याचा ओठ सुजला असून पाठीवर, पायावर, पोटरीवर वळ उमटले आहेत. अंग सुजले असून पायावर आणि हातावर लाठीने मारहाण केल्यानंतरचे व्रणही आहेत. डोक्यात देखील गंभीर दुखापत झाली आहे. मुका मारही बराच आहे.
तात्काळ केले निलंबन
डिलेव्हरी बॉयला मारहाण करणारा पोलीस कर्मचारी जीवन शेजवळ हा सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो घटनेच्या दिवशी रजेवर होता. मात्र, त्याने केलेल्या मारहाणीची पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. त्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त्यांकडे पाठविला होता. त्यानंतर जीवन शेजवळ याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी दिली.