….म्हणून फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने अवघा महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. ९ डिसेंबर रोजी घडलेल्या या अमानुष प्रकरणाला तब्बल २५ दिवस उलटल्यानंतरही काही आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असला तरी अद्याप तपास यंत्रणांना म्हणावं तसं यश आलं नाही.
अशातच मस्साजोग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे राजकीय अभय चव्हाट्यावर आले आहे. आमदार सुरेश धस यांनी गुन्हेगारीबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. सुरेश धस हे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून देखील आक्रमक असून त्यांनी याबाबत मोठी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे, तसे न झाल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते स्वीकारावे अशी थेट मागणी धस यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
“आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे ते नाही झाले तर आम्हाला अजित दादा झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर जसं ते (मुख्यमंत्री) सुतासारखा सरळ करतील, अजीत पवार सुद्धा करतील. अजित पवारांच्या हाताखाली मी काम केलं आहे. वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे हे करू नका.” असं धस यांनी म्हंटलंय.
धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा
सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणावरून थेट धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एका नामांकित वृत्त नवमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख, ‘आका’चे ‘आका’ असा केला होता. वाल्मिक कराड याला धस ‘आका’ या नावाने संबोधतात, ‘आका’चे ‘आका’ म्हणून धनंजय मुंडे यांचेच त्याला पाठबळ असल्याचे धस यांनी अधोरेखित केले आहे.