महाराष्ट्रराजकारण

बीडमधील हत्या, घोटाळे यासंदर्भात अमित शहाची भेट घेणार : सुप्रिया सुळे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच बीडमधील हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळ्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविषयी त्या संसदेत आवाज  उठवणार आहे. तसेच त्या अमित शहा यांनाही भेटणार असल्याचे सुप्रिया सुळे  यांनी सांगितले. त्यामुळे धनजंय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहे.

दुसरीकडे पालकमंत्री पदाची धुरा हाती घेताच अजित पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले आहेत. आज बीडमध्ये डीपीडीसीची बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र एकीकडे अजित पवार बीडमध्ये असताना आता सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “बीडमध्ये हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत. याची आत्ताच्या कृषिमंत्र्यांनी कबुली केली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर हा घोटाळा कुठे कुठे झाला आहे? याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती सरकारने द्यावी. या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर सरकार काय निर्णय घेणार? पिक आणि हार्वेस्टरबाबत आजच्या डीपीडीसीमध्ये चर्चा झाली पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे. गेल्या 51 दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत. मी ही पार्लमेंटमध्ये हा विषय मांडणार आहे आणि दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार आहे. तुमच्या महाराष्ट्रात काय आणि सुव्यवस्थेचे काय सुरु आहे,” याची माहिती अमित शाहांना देणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 

महाराष्ट्रात ही जी हफ्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी संपूर्ण ताकदीनिशी माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. भाजप आणि शिंदे साहेबांच्या खासदारांचीही भेट घेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे, जसं महाराष्ट्रात सर्व पक्ष मिळून पूर्ण ताकदीने सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाच्या मागे उभे राहिलेत, माणुसकीच्या नात्याने आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी संसदेत लढले पाहिजे.  मी स्वतः अमितजींची वेळ घेऊन सर्व खासदारांना घेऊन त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती देणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र, ते राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा. आम्ही सगळे अंजली दमानिया, बजरंग सोनवणे, बीडमधील सर्व आमदार हेच म्हणत आहेत, अजित दादा सज्जड दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांना विचारा,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत परराज्यातील महिलांनी बनावट कागदपत्रे बनवून मोबदला घेण्यात आला. याबाबतही सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सरकारी एजन्सी लाडकी बहिणींचे फॉर्म भरून घेतले तर सरकारने यावर उत्तर दिलं पाहिजे. अजून 2100 रुपये का आले नाहीत, सर्वांकडून राखी बांधून घेतली की, परत घेण्यासाठी तुम्ही सगळं केलं का?,” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button