बिगुल वाजलं, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार विधानसभेचे मतदान
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मात्र सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तसेच, 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.
आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात एकूण मतदार 9.63 कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4.97 कोटी इतकी आहे. तर 4.66 कोटी या महिला मतदार आहेत. यात 20.99 लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती?
महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601
शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
दिव्यांग – 6 लाख 2 हजार
नवमतदार – 1. 85 कोटी
पुरुष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.