चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवले
सांगोला शहरातील घटना ; २ अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला शहरातील मस्के कॉलनी येथे मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी, एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसका मारून नेहले असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी दिनांक १२ जानेवारी रोजी पुनम संदिप गिड्डे रा. मस्के कॉलनी, सांगोला, ता. सांगोला यांनी पोलीसात अज्ञात दोन चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची मुले घराच्या बाहेर खेळत होती, त्यांना घरात घेऊन जाण्यासाठी, फिर्यादी ह्या घराच्या बाहेर तीन नंबर मस्के कॉलनीच्या रोडवर आल्या.
त्यावेळी पाठीमागून नंबर प्लेट नसलेली एक मोटरसायकल आली, त्या मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या मानेला धरून ओढत नेले. फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिस्का मारून काढून घेतली.
तसेच फिर्यादी यांना पुढे फरफटत नेऊन व नंतर ढकलुन देऊन चोरटे तेथून निघून गेले, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.