महिलांवर अत्याचार करणाऱ्याविरुध्द करणार कडक कायदे : पंतप्रधान
जळगाव : देशात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांत वाढ हात आहे. त्यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या घटनांविरोधात राजकीय वातावरणही तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावत लखपती दीदी मेळाव्यात मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कडक कायदे करत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही, याबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यांबाबत वेगाने तपास सुरु करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यातही मदत होईल. अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची नव्या कायद्यात तरतूद केली गेली आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदी पुढे म्हणाले की, पहिले तक्रारी यायच्या की वेळेवर गुन्हा दाखल होत नाही. सुनावणी होत नाही. खटल्यांना खूप वेळ लागतो. अशा अनेक अडचणींना भारतीय न्याय संविधानाने दूर केले आहे. जर पीडित महिलांना पोलीस ठाण्यामध्ये जायचे नसेल, तर घरात बसल्याही गुन्हा दाखल करू शकतात. त्यामुळे कुठलीही गडबड होणार नाही. तसेच आता लवकर प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या लग्नाच्या नावाखाली धोका दिल्याचे प्रकरणेही समोर येतात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारच्या सोबत आहे. आपल्याला भारताच्या समाजाकडून या पापी मानसिकतेला थांबवावे लागेल. भारत विकसित होण्याच्या मार्गावर जात आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या भूमीचे मोठे योगदान आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.