पुण्याच्या चूहा गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे : उंदरासारखा कात्रज, तळजाई आदी डोंगराच्या ठिकाणी कोठेही लपून बसण्यास चाणाक्ष असलेल्या तौसीफ जमीर सय्यद उर्फ चूहा (२८, रा. जामा मस्जीद जवळ, संतोषनगर, कात्रज) याला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत आंबेगाव पोलीस ठाण्याकडून चूहा गँगवर कारवाई करण्यात आली आहे.
चूहा याला दोन वर्षाकरीता तडीपार केले असतानाही तो २४ नोव्हेंबर रोजी तडीपारीचा भंग करुन कात्रज, संतोषनगर येथे साथीदारांसह मिळून आला होता. त्याच्या कब्जात एक गावठी पिस्तुल, एक काडतूस, १५ ग्रॅम मॅफेड्रोन, एक कोयता, डिजीटल वजन काटा, सुतळी, स्क्रू ड्रायव्हर सापडले होते. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कारवाई दरम्यान चूहासह त्याचे टोळीतील सदस्य आरोपी सुरज राजेंद्र जाधव (३५ ता. करमाळा, जि सोलापुर), मार्कस डेव्हिड इसार (२९, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (२५, वडगाव शेरी ) यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान चूहा गँगविरुध्द मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी उप-आयुक्त स्मार्तना पाटील यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील यांना सादर केला होता. तो पाटील यांनी मान्य केला. त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे करत आहेत.
हा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहायक फौजदार चंद्रकांत माने, शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार ढमढेरे, मासाळ, विशाल वारुळे,, पोलीस नाईक जमदाडे, सावंत, धोत्रे, भोसले, जगदाळे, स्वप्नील बांदल यांचे पथकाने तयार केला होता.
चूहाचे कारनामे :
चूहा हा प्रत्येक गुन्हा करतेवेळी जाणिवपूर्वक वेगवेगळे साथीदार घेवून गंभिर स्वरुपाचे गुन्हे करत होता. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा प्रयत्न, घातक शस्त्राने दरोडा, शस्त्र बेकायदेशिररीत्या जवळ बाळगणे, मारामारी, दहशत माजविणे, यासारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. तसेच कोंढवा, कात्रज, संतोषनगर, मार्केटयार्ड व पुणे शहरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करुन आर्थिक फायद्यासाठी अनेक तरुण मुलांना व्यसनाधीन करुन त्यांना गुन्हेगारी टोळीमध्ये सामिल करुन टोळी वाढवली आहे.