विनोद कांबळीच्या उपचारासाठी मदतीचा ओघ
ठाणे : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालवल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर मदतीचा ओघ पुढे आला आहे.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कांबळी यांच्या मदतीसाठी पुढे आले असून, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात कांबळी यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंतीही त्यांनी केली.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डाॅक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते.
विनोद कांबळी यांना जेव्हा-जेव्हा उपचाराची गरज पडेल. त्यावेळेस, गंगुबाई संभाजी शिंदे, इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील.