मुंबई : पॉलिटीक्स इन्वेंटचा परळी पॅटर्न म्हणून प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचे नाव घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जवळचा पत्ता परळी आहे, असे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आता प्राजक्ता माळीनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरेश धस यांच्यावर आपण कुठलीही कारवाई करणार नसल्याचे अभिनेत्रीने म्हंटले आहे. प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये तिने सुरेश धस यांच्याबद्दलही चांगले उद्गार काढले आहेत.
सुरेश धसांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेवून सडकावून टीका केली होती. तसेच प्राजक्ता माळी यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
या नवीन व्हिडिओत प्राजक्ता माळी म्हणाली की, “आमदार सुरेश धस यांनी अत्यंत मोठ्या मनाने घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. दादा, तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंय. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती, हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे, आणि इथे छत्रपतींचे विचार पुढे चालवले जातात हेच तुम्ही ह्या कृतीतून दाखवून दिलंय. असं ती म्हणाली.
आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्याने मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. माझ्या बाजूने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकते. आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळ धाड पडते, असे म्हणत प्राजक्ताने खंतही व्यक्त केली आहे. कुठलंही आंदोलन, कुठलाही मोहीम, कुठलाही मोर्चा डायव्हर्ट करण्याचा माझा हेतू नव्हता. आमदार धस हे बोलले नसते तर मलाही अशाप्रकारे हे काही करायची गरज नव्हती, असे स्पष्टीकरण प्राजक्ता माळीने दिले आहेत.