भरधाव ऑडीने उडवले कार-दुचाकीला

नागपूर : भरधाव ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार काल मध्यरात्री समोर आला आहे. या भीषण अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झाले. तसेच कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास काचीपुरा चौक ते रामदासपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला.
पोलिसांनी याप्रकरणी कार चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांच्या विरोधात बेदारकपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे या चाचण्याचा रिपोर्ट हाती आल्यानंतर त्यांनी मद्य घेतले होते की नाही याबद्दल अधिकची माहिती मिळू शकणार आहे. दरम्यान अपघात घडवणारी ऑडी कार ही एका भाजप नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तरी पोलीस यासंदर्भात काहीही बोलायला तयार नसून त्यांनी याबद्दल कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाहीये.