तिघांच्या अत्याचाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

सोलापूर : विवाहित महिलेने आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवावा, यासाठी तीन मित्रांनी वारंवार त्रास िदला. तसेच ितच्यावर जबरी अत्याचार केला. ही बाब तू कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली होती. तिघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सुरज सुभाष नकाते (वय २९), तोसिफ चाँदसो मुजावर (वय २४), शुभम मोहन नकाते (वय २४) या तिघांना जेरबंद केले आहे. मोबाईल हिस्ट्रीवरुन आरोपी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी विवाहित महिलेला त्रास देत असल्याचे समोर आलं आहे.
मयत विवाहिता ही तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून गेली होती. सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास गावातील एका गृहस्थाने पीडित महिलेच्या पतीस फोन करून सांगितले की, तुमची पत्नी ही तलावात बुडून मयत झाली आहे.
मंगळवेढा पोलिसांनी विवाहित महिलेचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मयत महिलेच्या मोबाईल मधील चॅटिंग हिस्ट्री चेक केली असता वरील तिघे आरोपी सातत्याने मयतास अनैतिक संबंध ठेवण्याबाबत त्रास देत होते. तिला शारिरिक त्रास देत असल्याने त्या त्रासास कंटाळून तिने तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याची बाब समोर आली आहे. मयत विवाहित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
फिर्यादी तथा मयताचे पती व त्यांचे मुलाबाळासह कुटुंब हे पुणे येथे रहावयास होते. २८ जुलै २०२४ रोजी सहकुटूंब त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील एक संशयीत आरोपी हा नातेवाईक आहे. नातेवाईक आरोपी हा नेहमी पुणे येथे घरी विवाहितेचा पती घरी नसतानाही ये-जा करत होता. तो नातेवाईक असल्याने मयत विवाहित महिलेच्या पतीला संशय आला नव्हता.