लाडक्या बहिणींना वाढीव २१०० रुपयांचा हप्ताबाबत आदिती तटकरेंनी दिली ही माहिती

विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेतून महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास १५०० रुपयांवरून २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने केली होती. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, आता यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता राज्य सरकार 26 जानेवारीच्या आधी वितरित करण्यास सुरुवात करेल. यासंदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालं आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणींना लाभ देण्यास 26 जानेवारीच्या आधी सुरुवात करण्यात येणार आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही?
याबाबत बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं की, “आम्ही या विषयी आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत”, अशीव आदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार फेरतपासणी :
लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती. मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी केली जात आहे. तसेच अद्याप काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्यात येणार आहे.
‘या’ महिलाना मिळणार नाही योजनेचा फायदा :
अडीच लाखहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेरतपासणीत जर अशा महिला आढळल्या तर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता?
1) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2) राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4) लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.