दहा लाख नको नको, दोषी अधिकाऱ्यांस शिक्षा द्या : सोमनाथ सूर्यवंशी यांची आईने दुसऱ्यांदा नाकारली मदत

सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा 10 लाख रुपयांची शासकीय मदत नाकारली आहे. सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही, असं सूर्यवंशी कुटुंबीयाचं म्हणणं आहे. आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने घरी आलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा परत पाठवले असल्याचे म्हटले जात आहे.
पोलीस न्यायालय कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. तसेच सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांना वाढीव मदत देण्यात यावी, यासह अनेक मागण्या घेऊन आज परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आंबेडकरी अनुयायांकडून काढण्यात येणार आहे. परभणीतील धरणे आंदोलन स्थळापासून हा लाँग मार्च आज दुपारी 1 वाजता मुंबईकडे रवाना झाला आहे. दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे या लाँग मार्चचे नेतृत्व करणार आहेत.
शासनाकडून देण्यात आलेला 10 लाखांचा चेक परत
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली आहे. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार आदि पथकाने आज सोमनाथची आई आणि भाऊ यांची भेट घेऊन सरकारने जाहीर केलेली 10 लाख रुपयांची मदत घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत सोमनाथच्या मृत्युला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचे सोमनाथच्या आईने स्पष्ट केले. त्यामुळे, मदतीचा चेक घेऊन आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पथकाला दुसऱ्यांचा 10 लाख रुपये घेऊन परतावे लागले.
महिनाभरात दोषींना शिक्षा द्या
अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई यातील दोषी पोलिसांवर करण्यात आलेली नाही सरकारने जी समिती नेमलेली आहे ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश अचलिया यांची नियुक्ती केलेली आहे, त्याला तीन ते सहा महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र, ही बाब आम्हाला मान्य नसून एका महिन्यात चौकशी करून या दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केलेली आहे. तसेच आजच्या लाँग मार्चमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. परंतु, आईची तब्येत ठीक नसल्याने पुढे जाऊ शकू की नाही याचा विचार करू असे सोमनाथचा भाऊ प्रेमानंद यांनी म्हटले आहे.